Vat Pahnare Dar Marathi Kavita

प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं
खरंच सांगतो त्या दराच नाव आई असतं
उबदार विसाव्याच ते एकमेव स्थान असतं
प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं

वाट पाहणाऱ्या या दाराला आस्थेच महिरपी तोरण असतं
घराच्या आदरातिथ्याचं ते एक परिमाण असतं
नीतिमत्तेच्या उंबरठ्याआड मर्यादेचं त्याला भान असतं
प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं

दारिद्र्याच्या दशावतारात हे दार कधीच मोडत नसतं
कोणत्याही विचारांच्या वाळवीन ते कधी सादत नसतं
ऐश्वर्याच्या उन्मादात ते कधी फुगत नसतं
प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं

सुना नातवंडांच्या आगमनाला ते तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं
लेकीची पाठवणी करताना अश्रूंना वाट करून देतं
व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना ते जबरेन ताळ्यावर आणत
प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं

मित्रांनो उभ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट जपा
उपहासाची करवत या दारावर कधी चालवू नका
मानापमानाचे छिन्नी हातोडे या दारावर कधी मारू नका
स्वार्थी अपेक्षांचे खिळे या दारावर कधी ठोकू नका
घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला कधीच मोडकळीला आणू नका

कारण प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं
खरंच सांगतो त्या दराच नाव आई असतं
उबदार विसाव्याच ते एकमेव स्थान असतं
प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं

कवी : UNKNOWN