उजळू स्मृती कशाला अश्रूंत दाटलेली?
सांगू कशी कहाणी स्वप्नात रंगलेली?
आतूर लोचनांचे ते लाजरे बहाणे
मौनात साठलेले हितगूजही दिवाणे
नाती मनामनाची भाषेविनाच जुळली
ते फूल भावनेचे कोषात आज सुकले
संगीत अंतरीचे ओठी विरून गेले
हृदयास जाळणारी आता व्यथाच उरली
तू दाविलेस सखया मज चित्र नंदनाचे
उधळून तेच गेले संचित जीवनाचे
आता कुठे किनारा? माझी दिशाच चुकली
