Tulshiche Rop Mulgi

दारासमोर अंगणा मध्ये
सुबक रांगोळी दिसावी
प्रत्येक घरात कमीत कमी
एक तरी मुलगी असावी

मुलगी म्हणजे घरासाठी
जीव की प्राण
तिला पाहून हरपून जातं
सारं देहभान

मुलगी घरात असली म्हणजे
घर कसं फुलून जातं
तिचं असणं घरासाठी
चंदनाचा लेप होतं

का बरं तिचेच नाव
चोवीस तास येते ओठी
त्याग, प्रेम, माया, काळजी
शब्द फक्त तिच्यासाठी

आज सुकल्या सारखे दिसता
बाबा काही दुखतंय का?
असा प्रश्न मुलगीच विचारते
काळजात काही टोचतंय का?

आई वडिलांचं मन वाचण्याची भाषा
कुठून शिकली ती?
सारं दुःख कुशीत घेऊन
इतरांसाठीच जगते ती

मुलगी करते चिवचिवाट
म्हणून घर फुलून येतं
असो अथवा नसो काही
मन कसं भरून जातं

आई बाबांच्या म्हातारपणी
मुलगीच त्यांची आई
घर कितीही मोठं आसो
मुली शिवाय श्रीमंती नाही

मुलीसाठी देवासमोर
हात जोडून बसलं पाहिजे
प्रत्येकाच्या अंगणामध्ये
तुळशीच रोप असलं पाहिजे

Kavi – Unknown