पुन्हा पुन्हा शहारते, तुला म्हणून सांगते
मिठीत वेड वाढते, तुला म्हणून सांगते
जिथे जिथे खुणा तुझ्या, वसंत पेरतो सख्या
तिथेच मी विसावते, तुला म्हणून सांगते
तुझी प्रिया तुझ्यासवे, नभात झेप घ्यावया
गगनझुलाच मागते, तुला म्हणून सांगते
नजर कधी न लागण्या, तुला कुण्या सुरंगिची
इथून दृष्ट काढते, तुला म्हणून सांगते
तुझे अबोल राहणे, दिशात शून्य पाहणे
क्षणात मौन वाचते, तुला म्हणून सांगते
धुक्यास पांघरून मी, तनामनास जाळते
दवात रात जागते, तुला म्हणून सांगते
तुझ्याच आरशातला, चुकार चेहरा पुन्हा
नव्या ऋतूत पाहते, तुला म्हणून सांगते
