सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की,
अजूनही चांदरात आहे
कळे न मी पाहते कुणाला?
कळे न हा चेहरा कुणाचा?
पुन्हापुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे
उगीच स्वप्नात सावल्यांची
कशास केलीस आर्जवे तू?
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे?
