सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ।। धृ ।।
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?
भोलानाथ! भोलानाथ!!
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ।। १ ।।
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा
भोलानाथ! भोलानाथ!!
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ।। २ ।।
भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर
भोलानाथ! भोलानाथ!!
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ।। ३ ।।
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय
