निळें हें व्योम निळें हें सप्रेम ।
निळेपणें सम आकारलें ॥१॥
नीळवर्ण ब्रह्म नीळवर्ण कर्म ।
नीळवर्ण आश्रम गुरु देखे ॥२॥
निळेपणें वर्तो नीळेपणें खातों ।
निळपण पाहातो निळे पणें ॥३॥
निळिये रजनी वाहे मोतिया सारणी ।
निळेपणें खाणीं सांपडली ॥४॥
मन तो निळिये गोविंदाचिये सोसे ।
विरहिणी पाहे वाटुलि ऐसी ॥५॥
ज्ञानदेव आला नीळवर्ण शाळा ।
निळेपण गोंवळा रातलीये ॥६॥
