नामाचा गजर गर्जे भीमातीर
महिमा साजे थोर तुज एका ॥१॥
रिद्धीसिद्धी दासी अंगण झाडिती
उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी ॥२॥
चारी वेद भाट होऊनि गर्जती
सनकादिक गातीं कीर्ति तुझी ॥३॥
सुरवरांचे भार अंगणीं लोळती
चरणरज क्षिति शीव वंदी ॥४॥
नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू
करि तो सांभाळू अनाथांचा ॥५॥
