Naka Kadhu Photo

गेला माझा नवरा जरी मला नका भेटू,
माझ्या पोरा संग बसून नका काढू फोटू …

लाल दिव्याच्या गाडीतून येईल तुमचा ताफा
कॅमेऱ्यात बघून बघून मारल्या जातील थापा …

पांढरा धोट रुमाल काढून डोळेसुद्धा पुसाल
पोरक्या माझ्या पोरांना खेटून खेटून बसाल …

खोटा खोटा कंठ तुमचा नका देऊ दाटू
माझ्या पोरा संग बसून नका काढू फोटू …

धनी माझं गुणाचं, शेतामध्ये खपायचं
अर्ध्या पोटी राहून सुद्धा इभ्रतीला जपायचं …

काळ्या माईची वटी भराया कर्ज थोडं काढलं
पीक गेलं जाळून पण कर्ज मात्र वाढलं …

सावकार लागला छळू तवा धीर लागला सुटू
माझ्या पोरा संग बसून नका काढू फोटू …

पोरगं जातंय शाळेत त्याची फीस नाही भरायला
जनावरं दारात उभी चार नाही चरायला …

विहीर कधीच आटुन गेली बोरला नाही पाणी
करपलेल्या पिकाकड पाहत राहायचं धनी …

सरकार झालाय कोडग अन सावकार लागलेत लुटू
माझ्या पोरा संग बसून नका काढू फोटू …

रातच्याला जवळ घेऊन लई गोड बोललं
डोळ्यात दिसलं पाणी तवा काळीज माझं ह्लल …

जाग आली पहाट तवा जवळ नाही दिसलं …
पंख्याला फाशी घेऊन कुंकू माझं पुसलं ….

खोटे अश्रू डोळ्यात आणून आता नका चूटपुटू
माझ्या पोरा संग बसून नका काढू फोटू …

धनी होतं तवा कुणी धीर नाही दिला
आता किती तातडीने पंचनामा बी केला …

कॅमेरे घेऊन पांढऱ्या गाड्या आल्या दारामंदी
आभाळ फाटलय आमचं यांना प्रसिद्धी ची संधी …

म्हणे जग लई सुधारलाय पर माणुसकीच लागलीय आटू
माझ्या पोरा संग बसून नका काढू फोटू …

होईल घोषणा प्याकेजची मदतीला चेक येईल
माझ्या लेकरांचा बाप कोण आणून देईल …

धनी जरी गेलं तरी मी न्हाही हरायची
पोरांना करून पोरकं मी नाही मारायची …

तुमचं मात्र थांबवा ढोंग मला नका भेटू
माझ्या पोरा संग बसून नका काढू फोटू …

कवी – संदीप सानप