Maazi Chiu Ladli

अंधुक नाजरे वरचा चष्मा सांभाळत, अडगळीत सापडली एक बाहुली
हो हीच ती, हीलाच  सतत सोबत ठेवायची माझी चिऊ लाडली

मला हीच बाहुली हवी म्हणून किती आदळ आपट केली तिनं
पप्पा पप्पा म्हणत जीवनाला खरा अर्थ दिला तिनं

ती जन्माला आली तेव्हा मी भानावर आलो
आतापर्यंत उनाड मी कळले मी बाप झालो

रांगत रांगत तिनं अख्खं घर काबीज केलं
खळभर घराला घरपण तेव्हा आलं

यायचो कामावरून थकून भागून तेव्हा पळत येउन बिलगायची
रात्री आई जवळून उठून हळूच कुशीत माझ्या शिरायची

चेपून द्यायची अंग हात डोक्यावरून फिरवायची
अंघोळीला बसलो कि साबण पाठीला चोळायची

आईनंतर तीच झाली माझी आई हट्ट करून वाढायची
नको नको चिऊ म्हणताही घास प्रेमानं भरवायची

तब्येत सांभाळ पप्पा म्हणत औषध वेळेवर द्यायची
तडप्त्या उन्हात वाटायचा आधार तिचा ती सावली मायेची वाटायची

मुठभर वाळू घ्यावी हातात अन बघता बघता जावी निसटून
तसेच क्षणही गेले निघून माझ्या हातून

चिऊ माझी केव्हा झाली मोठी कळलेच नाही
घरात सर्वांनाच झाली तिची लगीन घाई

चिमणा राजा आला त्यानं गायीली गोडगोड गाणी
सोडून माझी बाग चिऊ राणी गेली दुसर्याच्या रानी

हुंदके देत रडली किती जाताना मायही तीची रडली
ओक्साबोक्सी रडली भावंड काळजाची खिल्पी उडली

मी मात्र उभा स्तिथप्रज्ञासारखा कर्तव्य पूर्ण करून
पण माझ्या मनाचाही महामेरू ढासळला जेव्हा चिऊ गेली माझ्या समोरून

जाता जाता मात्र म्हणाली, सांगा न बाबा आम्हालाच का हि शिक्षा
देतो बाप आपल्या मुलीला ताब्यात परक्याच्या, सहज द्यावी जशी भिक्षा

अशी कशी ही रीत बाबा मुलीला सर्वांपासून तोडते
आईबापांची तोडून नाळ इतरांशी नाते जोडते

सांगा न बाबा असे गप्पा का, सांगा न एकदा पुन्हा
कोणी काढली हि रीत, मुलगी असणे हाच का आमचा गुन्हा

आजही अडगळीतली खेळणी तिची छातीशी धरून रडतो
नाही उत्तर मिळत माझ्या चिऊ च्या प्रश्नाचे
का बाप कन्यादान करतो…. का कन्यादान करतो

Kavi – Unknown