Lek Aali Maherala

लेक आली माहेराला सुनबाई नीट वागा
दोन दिसांची पाहुणी राग राग करू नका

आली थकून भागून नको सांगू काही काम
माहेरच्या सावलीत तिला करू दे आराम

फार मनाची हळवी बोलू नको शब्द उणा
राख तिचा मानपान लाव तुझा मोठेपणा

लेक आली माहेराला कर काही गोड धोड
जिरे साळीच्या भाताला तूप वाढ लोणकढ

कर खमंग काहीसं दुपारच्या फराळाला
फार आवड फुलांची धाड निरोप माळ्याला

आणि लिंबाच्या झाडाला देई झोपाळा टांगून
तिचे बालपण तिला पुन्हा येऊ दे मिळून

लेक चालली सासरी जीव माझा हुरहूर
मुरडीचा कानवला गव्हल्याची कर खीर

ओटी भर, हाती देई खण जरीच्या काठाचा
दही घाल हातावर टांगा थांबला केव्हाचा

थकला ग माझा जीव हात पाय उचलेना
तूच आता तिची आई जप माझी भोळी मैना

कवी :UNKNOWN