Khel Mandiyela Valvanti Ghai Abhang Lyrics in Marathi

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई ।
नाचती वैष्णव भाईं रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी ।
एक एका लागतील पायीं रे ॥१॥

गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा ।
हार मिरविती गळां ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव ।
अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥

वर्णअभिमान विसरली याती ।
एकएकां लोटांगणीं जाती ।
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें ।
पाषाणा पाझर सुटती रे ॥३॥

होतो जयजयकार गर्जत अंबर ।
मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका ह्मणे सोपी केली पायवाट ।
उतरावया भवसागर रे ॥४॥

– संत तुकाराम महाराज