Kalya Matit Matit Song Lyrics in Marathi

काळ्या मातीत मातीत, तिफन चालते,
तिफन चालते, तिफन चालते

वीज थयथय नाचते, ढग ढोल वाजवितो,
ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो

सदाशिव हाकारतो, नंदी बैलाच्या जोडीला,
संग पारवती चाले, ओटी बांधून पोटाला

सरीवर सरी येती, माती न्हाती धुती होते,
कस्तुरीच्या सुवासानं, भूल जिवाला पडते

भूल जिवाला पडते, वाट राघूची पाहते
राघू तिफन हाकतो, मैना वाटुली पाहते

काळ्या मातीत मातीत तिफन चालते,
तिफन चालते, तिफन चालते

सर्जा रं माझ्या ढवळ्या रं.. माझ्या पवळ्या रं माझ्या आs हाs

झोळी झाडाला टांगून, राबराबते माऊली
तिथं झोळीतल्या जिवा, व्हते पारखी साऊली

अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती, जनू करती भजन

गव्हा जोंधळ्यात तवा, सोनं चांदी लकाकते
जशी चांदी लकाकते, तशी कपाशी फुलते

काळ्या मातीत मातीत तिफन चालते,
तिफन चालते, तिफन चालते

चालं ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ
लोनी पायाला वाटती, मऊ भिजली ढेकळं

काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो, काटा पायांत रुततो

काटा पायांत रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं, हिरवं सपान फुलतं

काळ्या मातीत मातीत तिफन चालते,
तिफन चालते, तिफन चालते

वीज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो,
ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो

चित्रपट : अरे संसार संसार (१९८१)
गीतकार : प्रा.विठ्ठल वाघ
संगीतकार : अनिल-अरुण
गायक : अनुराधा पौडवाल – सुरेश वाडकर