Kahi Nasnyatch Hota Aanand Motha

आर्थिक स्थौर्य मिळवताना बरंच गणित चुकत जातं
नसण्यातच आनंद असतो हे उत्तर शेवटी हाती येतं

लहानपणी शाळेमध्ये एकच ड्रेस असायचा
खाकी चड्डी पांढरा सादर प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा

पायात चप्पल असणं ही चैनीची गोष्ट असायची
गावात एखाद्या कडेच बाटाची चप्पल दिसायची

रेशनच्या दुकानावर लोकं अनेक चकरा मारायचे
तेव्हा कुठे वायरच्या पिशवीत किलोभर साखर आणायचे

वरच्या वर्गात जाताना पुस्तक जुनेच असायचे
शुभंकरोती आणि बे एक बे मात्र पोरं घरोघरी म्हणायचे

सडा, सारवण, धुणं, भांडी बायकांना तर आराम नव्हता
ज्याच्याकडे पाणी तापवायला बंब तोच सगळ्यात श्रीमंत होता

दिवाळीच्या फराळाला सर्वांनी एकत्र बसायचं
खवट खोबऱ्याच्या तेलामध्ये वासाचं तेल असायचं

कुठला मोती साबण अन कशाची काजू कतली
माया, प्रेम, आपुलकी इतकी की गोड लागायची वातड चकली

भात, पोळी, गोडधोड सणासुदीलाच व्हायचे
वाढलेले गार गरम सगळे आनंदाने खायचे

पिझ्झा, बर्गर, नूडल्स खाणं आजकाल रुटीन असतं
गरिबीला लपवणं कठीणच नाही तर जीवघेणं असतं

स्वयंपाकघर आता भरपूर किराणा मालाने भरलेले असते
खायची आता इच्छाच नाही म्हणून लोणच्याला बुरशी येते

हल्ली आता प्रत्येकाचं पॅकेज फक्त मोठं असतं
दिवाळीच्या दिवशी सुद्धा पॉश घर भकास वाटतं

का बरे पाहिल्यासारखे पाहुणे आता येत नाहीत?
हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर हेत नाहीत?

काय तर म्हणे आम्ही आता हाय-फाय झालो
चार पैसे आल्यामुळे खरंतर पुरतेच वाया गेलो

कशामुळे घात झाला काहीच का कळत नाही?
एवढं मात्र खरं की पाहिल्यासारखं सुख आता आजिबात मिळत नाही

प्रगती झाली कि अधोगती काहीच उमजेना ?
माणसाला माणसाकडून अजिबात प्रेम मिळेना

अहंकार कुरवाळल्याने प्रेमाचे झरे आटलेत
अन आधार गमावल्यामुळे “सायकियाट्रीस्ट” जवळचे झालेत

भ्रमामध्ये राहू नका जागं व्हा थोडं
मांसाशिवाय माणसाचं सुटत नाही कोडं

कवी : UNKNOWN