Kahbardar Jar Tach Maruni

सावळ्या:
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !
कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे
शीव ही ओलांडून तीरसे ?
लगाम खेचा हा घोडीचा राव टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणी !
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊ ही
मला का ओळखले हो तुम्ही ?
हा मर्द मराठ्याचा मी बच्‍चा असे
हे हाड ही माझे लेचेपेचे नसे
या नसानसांतून हिंमत बाजी वसे
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या !

स्वार:
मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा
कशाला ताठा तुज हा हवा ?
मुठीत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरे
वीर तू समजलास काय रे ?
थोर मारिती अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव भाला बरची तरी ?
हे खड्गाचे बघ पाते किती चमकते
अणकुचीदार अति भाल्याचे टोक ते
या पुढे तुझी वद हिंमत का राहते ?
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या !

सावळ्या:
आपण मोठे दाढीवाले अहा शूर वीर की –
किती ते आम्हांला ठाउकी !
तडफ आमुच्या शिवबाची तुम्हा माहिती न का ?
दाविती फुशारकी का फुका ?
तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी –
आमुच्या शिवबाने भर रणी
मी असे इमानी चेला त्यांचे कडे
हुकुमाविण त्यांच्या समजा याचे पुढे
देई न जाऊ मी शूर वीर फाकडे
पुन्हा सांगतो
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या !

लालभडक ते वदन जाहले बाळाचे मग कसे
स्वार परि मनि हळू का हसे ?
त्या बाळाच्या नयनी चमके पाणी त्वेषामुळे
स्वार परि सौम्य दृष्टीने खुले
चंद्र दिसे एक जणू, दुसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर –
आहेस इमानी माझा चेला खरा
चल इनाम घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या पुन्हा बोल एकदा
“खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या !”

कवी : वा. भा. पाठक


View All Deshbhakti Marathi Kavita

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *