जीवन गाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे
जीवन गाणे गातच रहावे
सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला
हृदये हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्यामाझ्या श्वासांमधुनी आकारा यावे
जीवन गाणे गातच रहावे
चिमणाबाई हिरमुसली, गाल फुगवुनी का बसली?
सान बाहुली ही इवली, लटकी लटकी का रुसली?
रुसली रुसली खुदकन हसली, पापे किति घ्यावे
जीवन गाणे गातच रहावे
मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी
आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या मातीला या प्रीतीला हितगुज सांगावे
जीवन गाणे गातच रहावे
