He Jeevan Sundar Aahe Song Lyrics in Marathi

हे जीवन सुंदर आहे

नितळ निळाई आकाशाची अन्‌ क्षितिजाची लाली
दंवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी

अहो ! आता विसरा हे सगळं
इथं इमारतींच्या जंगलातला वनवास
त्यातून दिसणारं टीचभर आकाश
आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास

कोठेही जा अवतीभवती निसर्ग एकच आहे
हे जीवन सुंदर आहे

पानांमधली सळसळ हिरवी अन्‌ किलबिल पक्ष्यांची
झुळझुळ पाणी वेळुमधुनी खुळी शीळ वार्‍याची

इथं गाणं लोकलचं
पाणी तुंबलेल्या नळाचं
आणि वारं डोक्यावर गरगरणार्‍या पंख्यांचं

इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे
हे जीवन सुंदर आहे

पाऊस झिमझिमणारा आणि पाऊस कोसळणारा
टपटप पागोळ्यांतून अपुल्या ओंजळीत येणारा

पाऊस म्हणजे रेनकोटचं ओझं
कपड्यांचा सत्यनाश
आणि सर्दीला निमंत्रण

जगण्यावरचे प्रेम जणू हे धुंद बरसते आहे
हे जीवन सुंदर आहे

गीत – सुधीर मोघे
संगीत – आनंद मोडक
स्वर – आशा भोसले, रवींद्र साठे
चित्रपट – चौकट राजा