दाटून कंठ येतो ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
हातात बाळपोथी ओठांत बाळभाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनी मी त्या गोड आठवाने
बोलांत बोबडीच्या संगीत जागविले
लय-ताल-सूर लेणे सहजीच लेववीले
एकेक सूर यावा न्हाऊन अमृताने
अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे
घेऊ कसा निरोप? तुटतात आत धागे
हा देह दूर जाता मन राहणार मागे
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्यापरी अता मी येथे फिरून येणे
