चाळीतला पाऊस बरा वाटायचा
कारण तेव्हा तो घरात ही यायचा
छपरावर आदळून तो किती जोराने पडतोय याचा अंदाज यायचा
दाराला प्लास्टिक लावून ओघाळणाऱ्या पवळाना अडवण्यात आनंद मिळायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा
शाळेची तयारी करताना तो नसायचा, घरातून बाहेर पडताना नेमका हजर व्हायचा
दप्तर भिजवायचा… पुस्तकांना भिजवून स्टोव्ह वरील भांड्यावर त्यांना उताणी पडायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा
वरा आला की टीव्ही वरील दूरदर्शनच्या कार्यक्रमांना फुल सटॉप द्यायचा
मग बाप माझा खांद्यावर घेऊन मला अँटिना हलवायला सांगायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा
मग कुठून तरी तो टिपटिप करून घरात गाळायचा
त्याखाली एखादं भांड ठेवून त्यातच त्याला साचवायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा
गटारातलं पाणी वाढवून तो मोरीत शिरायचा
आईची चीडचीड सुरू झाली की निमूटपणे मागे परतायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा
गांढूळ ही जमिनीतून घराच्या कोपऱ्यात शिरायचा
मग मीठ टाकून त्याच्या अंगावरील वेदना अनुभवायच्या
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा
साचलेल्या चिखलात तो पोरांना लोळवायचा
हातात शीग घेऊन मातीत खुपसून खेळायला लावायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा
उकिरड्याचा त्रास व्हायचा
पण तरीही पाऊस हवाहवासा वाटायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा
कारण तेव्हा तो घरात ही यायचा
