अवचिता परिमळु, झुळुकला अळुमाळू ।
मी ह्मणु गोपाळु, आला गे माये ॥१॥
चांचरती चांचरती बाहेरी निघालें ।
ठकचि मी ठेलें काय करूं ॥२॥
तो सांवळा सुंदरू कांसे पीताम्बरू ।
लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥
बोधोनी ठेलें मन तंव जालें आन ।
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥
बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।
तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥
