Aga Karunakara Abhang Lyrics in Marathi

अगा करुणाकरा करितसें धांवा
या मज सोडवा लवकरी ॥१॥

ऐकोनियां माझी करुणेचीं वचनें
व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥

मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव
ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥

उशीर तो आतां न पाहिजे केला
अहो जी विठ्ठला मायबापा ॥४॥

उरलें तें एक हेंचि मज आतां
अवघें विचारितां शून्य जालें ॥५॥

तुका ह्मणे आतां करीं कृपा दान
पाऊलें समान दावीं डोळां ॥६॥

– संत तुकाराम महाराज