Aaj Gokulat Rang Marathi Song Lyrics

आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढुनी खुशाल रंग टाकतो
रंगवून रंगुनी गुलाल फासतो
सांगते अजूनही तुला परोपरी ।।१।।
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी

सांग श्यामसुंदरास काय जाहले
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले
एकटीच वाचशील काय तू तरी ।।२।।
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी

त्या तिथे अनंगरंगरास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदंग मंजिर्‍यांत वाजला
हाय ! वाजली फिरून तीच बासरी ।।३।।
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी

– सुरेश भट