रे हिंदबांधवा, थांब या स्थळीं अश्रु दोन ढाळीं,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशिवाली ।। धृ ।।
तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ।। १ ।।
घोड्यावर खंद्या स्वार,
हातात नंगि तर्वार,
खणखणा करित ती वार,
गोर्यांची कोंडी फोडित, पाडित वीर इथे आली ।। २ ।।
कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमिच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली ।। ३ ।।
मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरू, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळीं ।। ४ ।।
