जांभुळपिकल्या झाडाखाली
ढोल कुणाचा वाजं जी
वेंधळ येडं पाय कुणाचं
झिम्मा फुगडी झालं जी
समिन्द्राचं भरलं गाणं
उधाणवारं आलं जी
येड्यापिशा भक्तासाठी
पुरतं लागीर झालं जी
मोडुन गेल्या जुनाट वाटा
हा बोभाटा झाला जी
चोचीमंधी चोच टाकुनी
दाणं उष्टं झालं जी
जांभळीच्या झाडाखाली
कोयडं बोऽल बोलं जी
जांभळीचं बन थोडं
पिकून पिवळं झालं जी
