भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
एकाच रानामंदी वाढलो एका ठायी
पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई
मनीची खूणगाठ लगीन गाठ झाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
रानाचा हिरवा शालू, आकाश नीळा शेला
हवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओला
बाशिंग डहाळीचं, वेलींच्या मुंडावळी
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
पानांची गच्च जाळी, काळोख दाट झाला
काळोख गंधाळला, काळोख तेजाळला
झुलती काळोखात गाण्याच्या दोन ओळी
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
