गगनसदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश देई अभय
छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्यातून तार्यांतून
वाचले तुझेच नाम
जग जीवन जनन मरण
हे तुझेच रूप सदय
वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतून
प्रेमरूप भासतोस
कधी येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय
भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकलशरण मनमोहन
सृजन तूच, तूच विलय
