चिंता क्रोध मागे सारा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
योगी पावन मनाचा
साही अपराध जनाचा
विश्व रागें झाले वन्ही
संते सुखें व्हावें पाणी
शब्दशस्त्रें झालें क्लेश
संती मानावा उपदेश
विश्व पट ब्रह्म दोरा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
ब्रह्म जैसें तैशा परी
अम्हां वडील भूतें सारी
अहो क्रोधें यावें कोठे
अवघे आपण निघोटे
जीभ दातांनी चावली
कोणें बत्तीशी तोडीली
मन मारुनी उन्मन करा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
