खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी ।
घेउनिया चारीतसे धेनु सांवळा ॥१॥
राधे तुझा मुकुंद मुरारी ।
वाजवि वेणू नानापरि ॥२॥
सकळ तीर्थें ज्याच्या चरणांवरी लोळती ।
तो ह्मणे राधिकेसी करीन मी तुझी वेणीफणी ॥३॥
एका जनार्दनीं रचिलें रासमंडळ ।
जिकडे पाहें तिकडे अवघें ब्रह्म कोंदलें ॥४॥
