वैष्णवां घरीं सर्वकाळ ।
सदा झणझणिती टाळ ॥१॥
कण्या भाकरीचें खाणें ।
गांठीं रामनाम नाणें ॥२॥
बैसावयासी कांबळा ।
द्वारीं तुळसी रंगमाळा ॥३॥
घरीं दुभे कामधेनु ।
तुपावरी तुळसी पानु ॥४॥
फराळासी पीठ लाह्या ।
घडी घडी पडती पायां ॥५॥
नामा ह्मणे नेणती कांहीं ।
चित्त अखंड विठ्ठलपायीं ॥६॥
