तूं माझी माउली मी वो तुझा तान्हा ।
पाजीं प्रेमपान्हा पांडुरंगे ॥१॥
तूं माझी गाउली मी तुझें वासरूं ।
नको पान्हा चोरूं पांडुरंगे ॥२॥
तूं माझी हरिणी मी तुझें पाडस ।
तोडीं भवपाश पांडुरंगे ॥३॥
तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज ।
चारा घालीं मज पांडुरंगे ॥४॥
नामा ह्मणे होसी भक्तीचा वल्लभ ।
मागेंपुढें उभा सांभाळिसी ॥५॥
