Adhik Dekhane Tari Abhang Lyrics in Marathi

अधिक देखणें तरी निरंजन पाहणें ।
योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥

देहबळी देउनी साधिलें म्यां साधनीं ।
तेणें समाधान मज जोडलें वो माये ॥२॥

अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें ।
सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये ॥३॥

चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला ।
तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥

पुरे पुरे आतां प्रपंच पाहणें ।
निजानंदी राहणे स्वरूपीं वोमाये ॥ ५॥

ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू ।
विठ्ठलु निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥

– संत ज्ञानेश्वर