ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला, तळमळला सागरा
भूमातेच्या चरणतला तुज धूतां, मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें, परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन, त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी
जगदनुभव-योगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी
येईन त्वरे कथुन सोडिलें तिजला, सागरा, प्राण तळमळला, तळमळला सागरा
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं, ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती, दशदिशा तमोमय होती
गुणसुमनें मी वेचियली या भावें, की तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे
नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे
फुलबाग मला हाय पारखा झाला, सागरा, प्राण तळमळला, तळमळला सागरा
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा, मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी, आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थ हें आता रे
बहु जिवलग गमतें चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे
त्वद्विरहाची शपथ घालितो तुजला, सागरा, प्राण तळमळला, तळमळला सागरा
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिउनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनातें देशी?
तरि आंग्लभूमी-भयभीता रे
अबला न माझिही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे
जो आचमनी एक क्षणीं तुज प्याला, सागरा, प्राण तळमळला, तळमळला सागरा
