छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी
रानपांखरासंगं गातो तुझी विठ्ठला, गाणी
मोत्यांच्या कणसांत डोलते तुझे देखणे रूप
निळंसावळं धुकं भोवती कुणी फिरवला धूप
ही भक्तीची फुलं उमलली विठू, तुझ्या चरणीं
पंख उभारून ऊस उभा हा, मोर जसा डोलतो
मुळा नि कांदा-कोथिंबिरिंतून विठू बघा नाचतो
घाम गाळिता रोप सुखावे, विठू तुझी करणी
मातीमधला अबीरबुक्का रोज लावितो भाळी
तुझं नाव मी घेता देवा, पान वाजवी टाळी
विठ्ठल अवघा झाला मळा, ओठी अभंगवाणी
