जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जिवलगा
विनविते सांगा । महिमा साधुसंतांचा ॥१॥
कैसी वसविली पंढरी । काय महिमा भीमातीरीं
पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥
कैसा आला हा गोविंद । कैसा झाला वेणुनाद
येउनी नारद कां राहिला ॥३॥
कृपा करा नारायणा । सांगा अंतरींच्या खुणा
येऊं दे करुणा । दासी जनी विनवितसे ॥४॥
