Tap Tap Tap Tap

टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !

उंच उभारी दोन्ही कान
ऐटीत वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा,कशास चाबुक ओढा !

सात अरण्ये,समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा,सोडा रस्ता सोडा !

कवी : शांता शेळके