Tevha Ti Mothi Hote

न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर झोपणारी मुलगी
आज पासून एकटी झोपणार म्हणते तेव्हा ती मोठी होते

चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी
आज रास्ता ओलांडताना दंड पकडून “सांभाळून बाबा” म्हणते तेव्हा ती मोठी होते

दोन केक आणि आईस्क्रीम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी
आज “बाबा, एक घास हवा का” विचारते तेव्हा ती मोठी होते

जरासे लागलं की आपण मलम लावताना आजून जोराने रडणारी मुलगी
आज “बाबा, डोकं दुखतंय, बाम लावू का?” विचारते तेव्हा ती मोठी होते

चॉकलेट साठी एक दोन रुपये हक्काने मागताना रडणारी मुलगी
आज “बाबा, पाहिजे तर माझ्या पिगी मधले पैसे घ्या” म्हणते तेव्हा ती मोठी होते

मिकी माउस आणि छोटा भीम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी
आज “बाबा, तुम्हाला बातम्या बघायच्यात?” विचारते तेव्हा ती मोठी होते

बाहेरगावी कामाला जाताना जाऊ नको म्हणत ब्यागेत जाऊन बसणारी मुलगी
आज “बाबा, तुमची बॅग भरू का?” विचारते तेव्हा ती मोठी होते

पटकन मोठी झालेली ती कंगना करून जाताना
“बाबा रडू नका” म्हणते पण स्वतः धाय मोकलून रडते तेव्हा मात्र परत लहान होते

कवी : मंदार करंदीकर