Ek Tari Mulgi Asavi

एक तरी मुलगी असावी उमलताना बघावी
नाजूक नखरे करताना न्याहाळायला मिळावी ।। १ ।।

एक तरी मुलगी असावी साजिरी गोजिरी दिसावी
नाना मागण्या पुरवताना तारांबळ माझी उडावी ।। २ ।।

एक तरी मुलगी असावी मैचिंग करताना बघावी
नटता नटता तिने आईला नात्यातली गम्मत शिकवावी ।। ३ ।।

एक तरी मुलगी असावी जवळ येउन बसावी
मनातली गुपितं तिने हळूच कानात सांगावी ।। ४ ।।

एक तरी मुलगी असावी गालातल्या गालात हसावी
कधीतरी भावनेच्या भरात गळामिठी घालावी ।। ५ ।।

एक तरी मुलगी असावी निदान सुनेच्या रुपात मिळावी
लेकीची कसर तिने थोडीतरी भरून काढावी ।। ६ ।।

कवी : आशा नाडकर्णी, बेळगाव