मंगळसूत्र आणि जोडवे या सगळ्यांमुळे नाही
तर भरलेल्या बॅगमुळे परके वाटते
आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी जाणवते
आई म्हणते अगं हे बॅगमध्ये लगेच भर
नाहीतर जाताना विसरशील, प्रत्येक वेळी काहींना काही विसरते
आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी जाणवते
माहेरी येण्याआधीच परत जाण्याचा बसचे तिकीट बुक असते
किती जरी सुट्टी असली तरी ती कमीच पडते
वाळूसारखी माहेरपणाची वेळ निसटून जाते
आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी जाणवते
आता परत कधी येणार? हा सगळ्यांचा प्रश्न ऐकून वाईट वाटते
मन आतल्या आत रडू लागते
मग जबाबदारीची जाणीव होऊन पुन्हा शहाण्यासारखे वागते
आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी जाणवते
माझ्या माहेरच्या खोलीचा कोपरा अन कोपरा फक्त माझा
आणि मी म्हणेल असा असायचा
पण आता पंखा आणि दिवा लावताना सुद्धा बटणाचा गोंधळ उडतो
प्रत्येक क्षण आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक जाणवून देतो
शेवटच्या दिवशी घरातून निघताना आईच्या डोळ्यात मी बघूच शकत नाही
कारण तसं केलं तर कधीच मी जाऊ शकणार नाही
मग तसंच पाणावलेले डोळे आणि बॅग घेऊन बसमध्ये बसावे लागते
आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी जाणवते
चार दिवसांची माहेरपणाची सुट्टी संपलेली असते
पाहुणचार घेऊन पाहुण्यासारखे आपापल्या घरी जावे लागते
आता मी पाहुणी आहे हे प्रत्येक क्षणी जाणवते