झाला झाडू दिवस झाला योगा दिवस
कधी येतोय साहेब आमचा शेतकरी दिवस
पन्नास किलोची गोणी बघा उचलून डोक्यावर
तीन तीन हांडे पाणी आणून दाखवा डोक्यावर
शेतकऱ्याच्या सुखासाठी करा एकदा नवस
कधी येतोय साहेब आमचा शेतकरी दिवस
पोटाची खळगी तुमची ठेवा जरा उपाशी
शिळी भाकर खा आमची नका खाऊ तुपाशी
आमच्या बापासारखा काढा एकतारी दिवस
कधी येतोय साहेब आमचा शेतकरी दिवस
नांगर धरून शेतात चालवून दाखवा दिवसभर
गळक्या पत्र्याच्या घरात राहून दाखवा रातभर
बिना लाईटची बघा आमची रोजची अमावस
कधी येतोय साहेब आमचा शेतकरी दिवस
विधवा झालेली शेतकरीण बघा तिचे हाल
शेतात राबणारी मोलकरीण घराविना बेहाल
तिचेही येउद्या साहेब एकदा सुगीचे दिवस
कधी येतोय साहेब आमचा शेतकरी दिवस
