परवा परवा बायकोची तब्येत नव्हती बरी
सर्दी, खोकला, तापाने फणफणली बिचारी
मी म्हणालो आराम कर मी कामच बघून घेईन
एक दिवस का होईना तुझं आयुष्य जागून घेईन
थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर तिच्या ठेवत होतो
थोडा थोडा बाम डोक्याला तिच्या लावत होतो
स्वयंपाकाची वाटलं करावी आता तयारी
बायको अंथरुणावरून पहात होती सारी
कणीक भिजवताना पडलं बरंच पाणी
पातेल्यात भाजीची करपून गेली फोडणी
करपलेल्या पोळ्यामध्ये बरेच होते नकाशे
बायको सारं पाहून गालातल्या गालात हसे
एका दिवसाच्या स्वयंपाकाने उडाली माझी तारांबळ
कुठून मिळत असेल बरं स्त्रियांना एवढ बळ
जेवण घेतलं वाढून बायको म्हणाली छान झालं
तिचं माझ्यावरचं प्रेम पाहून मन माझं भरून आलं
खारट तिखट भाजीसुद्धा ती आनंदानं जेवली
जळलेल्या पोळ्यावर तिने मनातून माया लावली
किती नावं ठेवतो आपण तिने केलेल्या स्वयंपाकाला
काय वाटत असेल बरं खरंच तिच्या मनाला
तिचा चवदार स्वयंपाक अजून चवदार लागतो
आजारी पडली तेव्हापासून मी शहाण्यासारखा वागतो
