Tu Javal Naslis Mhanun Kay Zale

तू जवळ नसलीस म्हणून काय झालं
आपल्या सोनेरी क्षणांना मी मनात जपतो
भूतकाळातल्या आठवणीत रममाण होतो
निसर्गातल्या सुंदरतेत तुझाच भास होतो

पक्षांची किलबिल कानाला गोडवा देते
जणू मंजुळ आवाजात तू मला बोलावतेस
नदीचा खळाळता प्रवाह धुंद करतो
तुझ्या मधुर हसण्याचा आभास देतो

पहाट गारव्याचा मंद वारा शहारतो
तू प्रेमाने स्पर्शून गेल्याचा भास होतो
सूर्याची कोवळी किरणे सर्वदूर पसरतात
तुझ्या ऊबदार प्रेमाची चाहुल देतात

पावसाची संततधार मला मंत्रमुग्ध करते
तुझ्या मायेच्या ओलाव्याची जाणीव होते
सागरात फेसाळणा-या लाटांवर मी आरूढ होतो
तुझ्या अवखळ स्वभावाची तो साक्ष देतो

तू जवळ नसलीस म्हणून काय झालं
आपल्या सोनेरी क्षणांना मी मनात जपतो
भूतकाळातल्या आठवणीत रममाण होतो
निसर्गातल्या सुंदरतेत तुझाच भास होतो

कवी : विजय जोशी