Jagnyatli Maja Vadvnyache Upay

जगण्यातली मजा वाढवण्याचे तसे बरेच उपाय आहेत
तुम्हीच पहा त्यातले कोणते सहजपणे जगणार आहेत

जिथे राहता त्या कॉलनीत चार तरी कुटुंब जोडा
अहंकार जर असेल तर खरंच लवकर सोडा

जाणं येणं वाढलं की आपोआप प्रेम वाढेल
गप्पांच्या मैफिलीत दुःखाचा विसर पडेल

महिन्यातून एखाद्या दिवशी अंगत पंगत केली पाहिजे
पक्वानांची गरजच नाही पिठलं भाकरी खाल्ली पाहिजे

ठेचा किंवा भुरका केल्यास बघायचंच काम नाही
मग बघा चार घास जास्तीचे जातात का नाही

सुख असो दुःख असो एकमेकांकडे गेलं पाहिजे
सगळ्यांच चांगलं होऊ दे असं देवाला म्हटलं पाहिजे

एखाद्या दिवशी सर्वांनी सिनेमा पाहावा मिळून
रहात जावं सर्वांशी नेहमी हसून खेळून

काही काही सणांना आवर्जून एकत्र यावं
बैठकीत सतरंजीवर गप्पा मारीत बसावं

नवरा बायको दोन लेकरांत “दिवाळ सण” असतो का?
काहीही खायला दिलं तरी माणूस मनातून हसतो का?

साबण आणि सुगंधी तेलात कधीच आनंद नसतो
चार पाहुणे आल्यावरच आकाश कंदील हसतो

सुख वस्तूत कधीच नसतं माणसांची ये-जा पाहिजे
घराच्या उंबऱ्यालाही पायांचा स्पर्श पाहिजे

दोन दिवस का होत नाही जरूर एकत्र यावं
जुने दिवस आठवताना पुन्हा लहान व्हावं

वर्षातून एखाद दुसरी आवर्जून ट्रिप काढावी
त्यांचं आमचं पटत नाही ही ओळ खोडावी

आयुष्य खूप छोटं आहे लवकर लवकर भेटून घ्या
काही धारा काही सोडा सगळे वाद मिटवून घ्या

कवी :UNKNOWN