Ya Zopdit Mazya

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्‍त झाली, या झोपडीत माझ्या ।। १ ।।

भूमीवरी पडावे, तार्‍यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ।। २ ।।

पहारे आणि तिजोर्‍या, त्यातूनी होती चोर्‍या
दारास नाही दोर्‍या, या झोपडीत माझ्या ।। ३ ।।

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भीतीन यावयाला, या झोपडीत माझ्या ।। ४ ।।

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हां जमीन माने, या झोपडीत माझ्या ।। ५ ।।

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ।। ६ ।।

पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ।। ७ ।।

‘तुकड्या’ मती करावी, पायी तुझ्या नमावी
मूर्ति तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ।। ८ ।।

कवी : संत तुकडोजी महाराज


View All Old Marathi Kavita

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *