Welcome 2017 नवीन वर्ष येतंय

फक्त एक दिवस राहिला या वर्षाचा. अजून एक दिवसाने नवीन वर्ष येईल. शुभेच्छांचा पाऊस पडेल Facebook, WhatsApp वर… बरेच नववर्षाचे मॅसेज फॉरवर्ड होतील… 31st च्या पार्ट्या होतील, दारु,नाचगाणी बरंच काही होईल…कुणाला म्हटलं तर तो लगेच म्हणेल अरे म्हणजे काय नवीन वर्ष येतंय, enjoy तर बनता है यार…

खरं तर वर्षाच्या शेवटच्या कडाला उभे राहून वर्षभराकडे बघितले तर बर्याच गोष्टी एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे नजरेसमोरून सरकून जातात…काही सुखद आठवणी हळूच स्पर्श करुन जातात.काही प्रसंग, घटना उगीच मनाला हळवं बनवतात… मन शोधत राहते त्या तारखांत जगलेले जीवन…खरंच किती जगलो आपण या 365 दिवसांत…

कितीदा हसलो असेल…आनंदात भिजलो असेल…कितीदा रडलो असेल…कोलमडलो असेल…पुन्हा उभा राहिलो असेल…कधी माझ्यामुळे कुणाच्या चेहर्यावर हास्य उमलले असेल…कोणाच्या डोळ्यांत माझ्यामुळे अश्रूही आले असतील…कुणाला मी कधी कुठली प्रेरणा दिली असेल तर कधी मी कुणाकडे बघून उभारी घेतली असेल… कुठल्या एखाद्या दिवसाने शिकवले असेल इथले वास्तव व्यवहारज्ञान…कधी खाल्ली असेल ठोकर आणि अधिकच वाढली असेल समज…

कुणी भेटला असेल पाठीशी उभे राहणारा…कुणी सोडून गेला असेल… काही कामे झाली असतील काही तशीच यादी बनून राहिली असतील…
प्रत्येक दिवस उलटून जातांना त्यांनी बरेवाईट अनुभव सोडलेलेच असतात पाठीशी…

काळ हि एक अद्भुत गोष्ट आहे…जेव्हा वेळ जावा असे वाटते तेव्हा क्षण हि मोठा वाटतो आणि जेव्हा वेळ हवी असते तेव्हा वर्ष, महिने ही क्षणाप्रमाणे सरकून जातात.काळ मात्र कधीच थांबत नाही…कुणासाठीच…खरंतर तो टिकटिक ही नाही करत…तो शांत, निश्चीलपणे सरकत असतो पुढेपुढे. मागे एक धूसर रेषा सोडत जातो..रॉकेटप्रमाणे…हळूहळू धूसर होणाऱ्या…त्यांनाच आपण आठवणी म्हणतो…या आठवणी मात्र कायम टिकून राहतात…कालातीत बनून…

नव्याचे स्वागत करायला सर्वच होतो आपण सज्ज…अशा स्वागत केलेल्या कितीतरी वर्षांनाही आपणच दिलेला आहे निरोप दरवर्षी…आता पुन्हा नवीन 365 दिवस येताहेत आपल्या हातात…नव्या जोमाने करु आपण सर्व त्याचे स्वागत पण त्यापूर्वी घेऊ आपण जुन्या वर्षांचा आढावा या वर्षात मी काय कमावले काय गमावले…काय ध्येय होती…कितपत साध्य झाली…किती प्रयत्न केले…किती यश मिळाले…कितीदा पराभव पत्करावा लागला…कितीदा मुसंडी मारली…काय शिकलो या वर्षात…? कोण कोण सोबत होते या प्रवासात…या सर्वांची गोळाबेरीज करुच या कोपर्यावर बसून…. दोन अश्रू ढाळायचे राहिले असतील…थोडंसं हसायच बाकी असेल ते सर्व करुच…या कडेला बसून…

एक नवीन सूर्य दिसतोय 2017 च्या वर्षात त्याचे स्वागत करुया आनंदाने…हसतमुखाने…सामर्थ्याने… नवउल्हासाने…
सरत्या वर्षाला हृदयात जपून करुया पदार्पण एका नवीन 365 दिवसात…एका नव्या वर्षात…

© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *