To Ek Baap Asto

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो…

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं…

सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात
एटीकेटीच्या चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात
माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्‍या गाजत असतात…

परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या
नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्‍या
आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात
नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात…

नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात
एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात
दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं
नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं…

नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो
जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान…

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक
बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो…

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं
भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो…

डोक्‍यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो
दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो…

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही
बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही
पोरं सोडतात घरटं अन्‌ शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी…

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं
अपयश पचवताना, ते आतून रडत असतं
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो…

सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं
आकाशाहून भव्य अन्‌ सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते…

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय
बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही…

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही
चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही
सोनचाफ्याचं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही
बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही…

केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा
जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही
आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही…

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा
आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्‍वास हवा
बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं…

कवी – अभिजित थिटे


View All Marathi Kavita On Father

Liked it? Share with your friends...

2 thoughts on “To Ek Baap Asto

  1. Lovely poem , a silent tribute to fathers . The role father plays the background the Base he forms , little does one realise . Thank you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *