Sunecha Baalantpan…Kunachi Jababdaari?

सुनेचं बाळंतपण… कुणाची जबाबदारी?

“कसला गोड आहे गं चित्रा तुझा नातू! अगदी बापावर गेलाय हं!” रमा काकू म्हणाल्या. मधेच अजून बायकांचे बोलणे सुरू होते कुणी म्हणे उंचापुरा निघेन, कुणी म्हणे गोरा गोमटा आहे हं तर कुणी म्हणे डोकं मोठं आहे, हुशार निघेन खूप.. आणि बरच काही…

मधेच बायकांच्या घोळक्यातल्या एक दुसऱ्या आजींचा आवाज आला, “नाक जरा चपटं आहे ग, आई वर गेलय वाटतं!” लगेच दुसऱ्या आजी म्हणाल्या,” नाही ग, पहिल्या दिवशी दवाखान्यात मी बघितलं तेव्हा तर तरतरीत होतं. त्याची आई झोपून दूध पाजत असेल म्हणून चेपलं गेलं असेल”..

लगेच चित्रा ताई, विनिताच्या आईला म्हणाल्या, “का हो, विहिनबाई तिला सांगितलं नाही का, झोपून दूध नको पाजू.” विनिताची आई म्हणली,” टाके आहेत ना तर डॉक्टरने जास्त हालचाल नाही सांगितली करायला”.

त्यावर चित्रा ताई म्हणे, “आजकालच्या पोरींना काहीच सहन होत नाही, बाई आम्ही कशा डिलिव्हरी झालो कुणाला माहीत पण नाही पडायचं!” विनिताचा चेहरा पडला पण परत हसून मिक्स झाली सगळ्यामध्ये. परत कुणीतरी म्हणे , साडीच नाही नेसली तिने, कुणी म्हणे पायाच नाही पडली माझ्या अजून बरच काही..

सगळा प्रसंग विनिताच्या माहेरचा.. बारीच्या दिवशी चांगल्या पंचवीस सव्वीस काही म्हाताऱ्या आणि तरुण बायका घेऊन विनिताचे सासू सासरे बाळाला बघायला आले होते. तिला नववा महिना लागल्यापासून सगळ्याच सासरच्या मंडळींचं लक्ष तिच्या डिलिव्हरी कडे लागलेलं होतं.

पाहिलं बाळंतपण म्हणजे माहेरीच(अलिखित नियमच आहे तसाही तो, काहिंकडे तर सगळीच बाळंतपण माहेरी करतात)! बरं आधीपासून या कार्यक्रमाची सगळी रूपरेषा विनिताच्या सासूने तिच्या आईला फोन वरच सांगून ठेवली होती. पुरणाचा स्वयंपाक करावा लागेल, सगळ्या बायकांना साड्या आणि माणसांना कपडे घ्यावे लागणार इत्यादी.

विनिताच्या आईची परिस्थिती जेमतेम होती पण मनाने खूप त्या खूपच श्रीमंत. घरी आलेला कुणी न जेवत जाणे तर शक्य नाही त्यांच्या. विनिता आणि तिचा नवरा महेश यांचं आधीच ठरलेलं होतं मुलगा असो की मुलगी एकच अपत्य बस आणि महेश खूप स्वावलंबी तर त्याच्या मते मूल आपलं मग दवाखण्याचा खर्च विनिताच्या आई वडिलांनी का करायचा? त्याच्या घरी हेच बोलणं असायचं की पाहिलं बाळंतपण माहेरचेच करतात, खर्चही तेच करणार पण महेशने या बाबतीत कुणाचंच काहीही ऐकलं नाही.

त्यामुळे घरचे नाराज होते जर पण मुलगा झाल्यामुळे विसरले ते दुःख सगळे (आजही मुलगा मुलगी हा भेदभाव आहेच, कुणी कितीही काही म्हंटल तरी). विनिताच्या सासर्यांनी तर बोलूनही दाखवलं होतं डोहळ जेवणाच्या कार्यक्रमात विनिताच्या आईला, “नातू झाला तर कार्यक्रम जोरात होईल बारीचा, मुलगी झाली तर थंड होईल थोडा आणि लोकही कमी येतील बघायला!”

सगळा कार्यक्रम पार पडला.. छानच म्हणायचा! साड्या, कपडे वाटप झाले. प्रत्येकीला आपला अवडता रंग पाहिजे होता… काही तरुण बायकाही होत्या त्यांना आवडल्या साड्या पण काही जुन्या बायकांना पोत नाही आवडला तर काहींना डिझाइन तर काहींना रंग.. आता अजून कशा साड्या पाहिजे हेच विनिताला समजत नव्हतं… काही चेहरे तर अशे पडले होते जशे ही एकच साडी त्या आयुष्यभर नेसणार आहेत आणि न आवडती साडी जणू काय थोपलीये त्यांच्यावर..

जाताना एक आजी म्हणे पुरणपोळीचे काठ कडक होते जरा, मला चावलेच गेले नाही. तर दुसरी आजी एकीच्या कानात सगळ्यांना ऐकू यईल या स्वरात(मुद्दाम), “५००/- रुपड्याची साडी घ्यायला एवढं लांब आणलं बाई, मलाच हौस १०००/- रुपयांचा दागिना घेऊन आले बाळाला”.. त्यांचे बोलणे ऐकून चित्राताईलाही जोर चढला. जाताना एक शब्द नीट बोलल्या नाही विनिताच्या आईशी.

आता हे सगळं बघून आणि ऐकून विनिताच्या आईचा खूपच हिरमोड झाला. त्यांना खूप वाईट वाटत होते की पाहुणे त्यांच्या दारातून जाताना हसत नाही गेले. असाच दीड महिना निघून गेला. पाहुणे येऊन साड्या घेऊन,जेवून जात होते. विनिता आता सासरी आली. घ्यायला सासारहून मंडळी आली त्यांनी तिच्या आईला साडी आणली, असेल १०००/-रुपयांची पण गेल्यावर सासूने चार वेळा बोलून दाखवली तिला..

पुढेही हेच चालू राहिलं, बाळाने काही छान केलं की खानदानच आमची तशी आहे, सगळे हुशार!! आणि काही वेडंवाकडं केलं की आईच्या वळणावर गेलाय बाई…

आता हे झालं विनिताच्या बाबतीत पण थोड्याफार प्रमाणात आपण सगळ्यांनीच हे सगळं अनुभवलंय.. आता खरं बघायला गेलं तर मुल ही आई वडिलांची जबाबदारी आहे मग दवाखान्याचा खर्च मुलीच्या आई वडिलांनी का करायला हवा? दुसरं म्हणजे ठीक आहे नवीन आईला आराम मिळावा म्हणून तिला माहेरी पाठवतात..

कारण ती उठू शकत नाही मग आयतं जेवायला कोण देणार सुनेला, तिचे कपडे कोण धुणार कारण आजही सुनेचे कपडे धुणे म्हणजे सासूसाठी खूपच मोठी गोष्ट आहे, त्यातही एखाद दुसरी धूत असेल तर बाकीचे बोलून बोलून तिला टोचणार किंवा सासुच बोलून दाखवणार दहा वेळा तुझे कपडेही धुते मी अजून काय करू? बरं पाठवलं माहेरी तर बाळाला बघायला एवढा लवाजमा घेऊन का जायचं? तेही हेच पाहिजे, तेच पाहिजे जेवायला, अशाच साड्या अमूक धमुक!!

त्यात सुनेचेही हाल, तिच्या माहेरच्या लोकांचे हाल, बाळाचे हाल ते वेगळेच.. आणि त्यात असं बोलून त्यांना दुखावून यायचं.. काय मिळत असेल अशा बायकाना देव जाणे. अजून त्यात नातवाची तब्येत बिघडली तरी सुनेच्या आईला बोल, सुनेला बोल काय गरज आहे का? तुमच्या घरी आल्यावर कुणी येतं का तुम्हाला बोलायला तुम्ही स्वेटर नसेल घातलं, अंघोळ नीट नसेल घातली किंवा काहीतरी वेडंवाकडं खायला घातलं असेल आईला तेव्हाच बाळ रडतंय..हे सगळं खापर सुनेच्या आईवर नक्की फोडलं जातं..

याचा त्रास माहेरच्यांना होतोच पण या सगळ्या परिस्थितीत त्या बाळंत आईच्या मनावर खूप वाईट परिणाम होत असतो परिणामी तिची चिडचिड होते आणि मग पुन्हा तिलाच दोषी ठरवलं जातं. ती एवढया मोठ्या शारीरिक आणि मानसिक बदलातून एक नवा जन्म घेऊन आलेली असते तिला भावनिक आधाराची गरज असते, अशावेळी हे वागणं अतिशय चूक आहे.

मित्रमैत्रिणींनो समाजात अजून खूप मोठा भाग अजूनही या जुन्या चालीरीती प्रमाणे वागतोय.. आपल्या आजूबाजूला कित्येक लोक आशा गोष्टी आजही करतात.. ज्यांच्या नशिबात हे सगळं नाही आलाय त्यांना नशीबवान म्हणावं लागेलं पण मला खात्री आहे अशे लोक फार कमी असणार.. पण आपण नक्कीच या गोष्टींवर विचार करायला हवा आणि जिथे आपल्या हातात असेल तिथे या गोष्टीला आळा घालायलाच हवा.

©सुवर्णा राहुल बागुल

Liked it? Share with your friends...

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *