शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा
संध्यासमयी संध्येसम हा मंत्र जपावा सदा
पुनव रुपेरी, दीपावली वरी जरि उजळे अंबरी
देवापुढती नित्य विसावी एक ज्योत कापरी
त्या ज्योतीने भवति फुलावी शांतीची प्रतिपदा
सांज-प्रहरी सदनी लाविता सांजवात चिमुकली
प्रसन्न होउनी लक्ष्मी येई गेही सोनपाउली
समीर येई मंद गतीने लुटीत निशिगंधा
घरकुल अपुले मंगल मंदिर गाभारा मनिचा
हर्ष-फुलांनी सदा भरावा सुरम्य प्रीतिचा
गृहमंदिरी गंध सुखाचा पसरावा सर्वदा