Marathi Stories

Shikleli Sun | शिकलेली सून

“कीर्ती.. मावशीला शुभम करोती म्हणून दाखव बरं…” रेवती नुकतीच ऑफिस मधून आलेली, दारात सासूबाई, शेजारीण आणि तिची मुलगी बसलेल्या, मुद्दाम रेवती ला डीवचण्यासाठी शेजारणीने मुलीला प्रश्न विचारला, थोडक्यात आपण नोकरी न करता मुलीवर किती छान संस्कार करतोय हे तिला दाखवून द्यायचं होतं. त्यात सासूबाई होत्याच अजून तेल ओतायला.

“अरेवा कीर्ती… किती छान म्हणतेस.”

“शिकवावं लागतं मुलांना, त्यासाठी मुलांवर संस्कार करायला घरी असावं लागतं…” सासूबाईंनी टोमणा मारला.

रेवती दुर्लक्ष करून घरात आली. लाडका सोहम कसलीतरी पुस्तकं चाळत होता. “काय करतोय बेटा?”

“आई तुझी पुस्तकं बघत होतो, हे कसलं चित्र आहे??”

“बेटा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वेगवेगळ्या चिप्स वापरल्या जातात. कॉम्प्युटर मध्येही याच आधारे प्रोग्रॅम चालतात. ही मोठ्यांची पुस्तकं आहेत, मी तुला इलेक्ट्रॉनिक चे लहान मुलांचे पुस्तक आणून देईन हा… मग तुला नीट समजेल…”

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेल्या रेवती ने आपल्या करिअर ला मुलानंतर प्राधान्य दिलं होतं, मशीन प्रोग्रामिंग मध्ये तिचा हात कोणीही धरू शकत नव्हते. एक दिवशी रेवती ने सोहम च्या गळ्यात एक ताविज बांधली आणि सोहम ला सांगितलं की ‘हे देवाचं असतं, कधीही काढायचं नाही…’

सासूला नवल वाटलं, देवाधर्माला जास्त न मानणारी आज सोहम च्या गळ्यात ताविज बांधतेय, आणि तेही देवाचं??? सासूचे म्हणणे होते की घरात राहून मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, नोकरीची गरज नाही. पण त्यांना कसं कळणार.. की मुलं आपल्या आई वडिलांनीच प्रेरणा घेतात, आज रेवती ला कष्ट करताना पाहिल्यावर सोहम सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवणार होता.

एके दिवशी रेवती ला घरी यायला उशीर झाला. सासूबाई सोहम ला बागेत घेऊन गेल्या. सोबत किर्तीलाही नेलं. कीर्ती ची आजी आणि सोहम ची आजी एकमेकांशी गप्पा मारत बसलेल्या. सोहम आणि कीर्ती कडे एकदा बघू म्हणून त्यांनी नजर वळवली, पण दोघेही गायब… सगळीकडे शोधलं… पण कुठेही पत्ता नाही. आजीला घाम फुटला.

रेवती आली, सासूबाई तिच्यावरच ओरडल्या, “पोरांपेक्षा महत्वाचं आलं का काम? इकडे माझ्याकडून काही होत नाही, ताकद नाही राहिली माझ्यात…”

तिकडे कीर्ती च्या आईची रडारड सुरू झाली.. “कुठे असेल माझी पोर… कोणी उचलून तर नेलं नसेल ना? फोन जवळ ठेवा… काय मागतील ते देऊ… पण माझी पोर मला परत हवी…” नको नको ते विचार नेहा च्या मनात यायला लागले.

रेवती मोबाईल मध्ये घाईघाईत काहीतरी करत होती, रेवती ला शांत पाहून सासू अजून चिडली… “आईचं काळीज आहे की नाही तुला?पोराची काळजी आहे की नाही? ती नेहा पोरीच्या काळजीने धाय मोकलून रडतेय..आणि तू??”

रेवती दुर्लक्ष करत बाहेर निघून गेली… 15 मिनिटांनी कीर्ती आणि सोहम ला घरी घेऊन आली. कीर्ती येताच तिच्या आईने तिला मिठी मारली.. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

गल्लीत एक उंट आलेला आणि ही पोरं त्या माणसांमागे पळत गेलेली लांबपर्यंत. “काळजी करू नका.. सोहम च्या गळ्यात जी ताविज आहे ती साधीसुधी नसून त्यात GPS चिप आहे. सोहन कुठेही असला तरी त्याचं लोकेशन मला मोबाईल वर दिसेल.. 

आणि रडून मोकळी होते तीच आई असते असं नाही, जी मुलासाठी खंबीरपणे लढते तीही आईच असते… संस्कार करायची पद्धत वेगळी असेल, प्रेम करण्याची पद्धत वेगळी असेल… पण आई ही आईच असते..”

सून शिकलेली असल्याचा आज सासूला पहिल्यांदा अभिमान वाटत होता…

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *