Premachi Bhint

प्रेमाची भिंत

हम्म , काय तर मग महिला मंडळी , गेली का बच्चे कंपनी शाळेला ,आवरले का सगळं घरचं काम , नाही म्हटलं पाय सोफ्यावर घेऊन हातात स्मार्टफोन घेऊन निवांत आहात म्हणून हा जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला ! एकमेकींशिवाय कोण विचारणार नाही का आपल्याला असा सवाल!

 

शिर्षक जरा वेगळंच आहे नाही आज , पण तुमच्या डोक्यात हा विचार आला असणार ही कोणत्या भिंती बद्दल बोलतीये , आणि भिंतीवर कुणी प्रेम करते का ! कधी काय विचार येतील डोक्यात सांगता येत नाही हिच्या!

 

ओके ओके , सांगते ऐका , सकाळी सकाळी म्हणजे उठल्यापासून आणि दिवसातला बहुतांश वेळ तुमचा कुठे जातो , तर स्वयंपाकघरात ! मुलांचे आणि घरातल्याचे डबे , नाश्ता , जेवण , संध्याकाळच्या खाण्याची आणि जेवणाची तयारी मग आता मला सांगा साधारण ५ तास इकडे तिकडे इथेच जातात तुमचे ! बरं आपण स्वयंपाक करतो तेव्हा बऱ्याचदा आपण काही मसाले , मीठ , कांदा , लसूण हे बेमालूमपणे पण अचूक टाकत असतो , हे करताना आदल्या दिवसाच्या घडामोडी आठवतो , काही वेळा संध्याकाळच्या जेवणाची जुळणी करतो हे सगळे कुठे , गॅस समोर उभे राहून समोरच्या निर्विकार भिंतीकडे बघत आपण मनातल्या गुजगोष्टी तिच्याकडे बघत मनातल्या मनात पुटपुटत असतो , खरं का नाही ते सांगा!

 

बऱ्याचदा काही गोष्टींचे वाईट वाटले की आपण दोन टीपूस गाळतोच की (मला होते कधी कधी) ते पण हिच्याशिवाय कुणी बघत नाही किंवा कुणाला कळत सुद्धा नाही ! रोजच्या रोज कुकरच्या शिटीतून निघणारी स्टीम सुद्धा ह्याच भींतीच्या चेहऱ्यावर लागते तेवढीच तिचे फेशियल होते नाही का , कधी कधी तर बिचारीला डोळ्यात तिखट सुद्धा झोम्बत असेल नाही!

 

बरे ही नूसत्या गप्पा ऐकत नाही तर मनातली चरफड ही मग फोडणीतून उडालेली मोहरी आपल्या अंगावर उडवून घेते आणि तिला जखडून ठेवते का ? तर ती परत उडून आपल्याला लागू नये म्हणून ! हे तर झालेच शिवाय आपल्या मनातल्या जखमा सुद्धा मग ही स्वतःला हळदीच्या शिंतोड्यानी शांत करते , स्वतः वर डाग घेते पण आपल्या मनातली सल झेलते. मग कधीतरीच आपले स्वयंपाक करताना लक्ष जाते तेव्हां आतून वाईट वाटतं बिचारी किती डागाळलीये नाही ? मग एक दिवस मुहूर्त काढून आपण पदर( टी -शर्ट) खोचून तिला स्नान घालायला तयार करतो ! लखलखीत होते पुन्हा एकदा आपल्या मनातल्या किल्मिशांना उचलून धरायला!

 

झाले ना वाचून , एवढेच लिहायचे होते , एवढा सगळं प्लॅन लिहिण्याचा का केलाय माहितीये का कारण ” मी आजच धुतलीये गॅस च्या पलीकडची भिंत रोज धुणे जमत नाही ना , आणि तुम्ही निवांत बसलेले मला सहन होईना म्हणून हा प्रेमाच्या भिंतींचा अट्टाहास , काहीतरी वेगळं शिर्षक दिल्याशिवाय वाचक वाचणार कसे,

 

अहो झाले लिहून , उठा की ग जा आंघोळ घाला जा तिला ! केविलवाण्या चेहऱ्याने ती तुमची वाट बघतीये!

 

बाई ‘तेरी भिंत मैली हो गयी जेवण के मसाले का डाग धोते धोते , हो ओ ओ ओ!!

(वरच्या दोन लाईनी “राम ‘तेरी गंगा मैली हो गयी पापियों के पाप धोते धोते ह्या ट्यून मध्ये गाऊन वाचावीत)

© Mohini Kulkarni Watave

Liked it? Share with your friends...

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *