Pratyek Aai Astech Hirkani

प्रत्येक आई असतेच हिरकणी!!!

हिरकणी…वाचताच डोळ्यासमोर उभी राहिली ना?? हिरकणी…हे नाव उच्चारलं तर प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर उभी राहते ती एक धाडसी आईची प्रतिमा. कपाळावरची आडवी चिरी, केसांचा अंबाडा, कंबरेला खोचलेला पदर आणि आपल्या बाळासाठी जीव धोक्यात घालुन अजस्त्र असा रायगड उतरून आलेली रणरागिणी!!!

आजपासून साडे तीनशे वर्षांपूर्वी कोजागिरीच्या दिवशी घडलेला प्रसंग..गडाचे दरवाजे बंद झाले आणि आपल्या लेकराच्या काळजीने व्याकुळ झालेली ती आई, आभाळाला भिडलेला आणि भुईवर अस्ताव्यस्त पसरलेला असा रायगड, जिथून फक्त हवा वर येऊ शकते आणि पाणी खाली उतरू शकते असं त्याचं वर्णन इतिहासात आहे..तो रायगड उतरून, असंख्य संकटांवर मात करत ती आपल्या बाळापर्यंत पोहचली होती… कुठून आलं असेल एवढं धाडस, साहस आणि निर्भयता??? अनन्यसाधारण दिसणारी ही स्त्री जन्मतःच हिरकणी होती का हो..हिरकणी हे फक्त एक नाव म्हणून नाही म्हणायचंय मला..ती एक भावना आहे, एक रणरागिणी आहे, एक दिव्यशक्ती आहे, एक प्रकाशमय ज्योत आहे..तर तिच्यातल्या आईने तिला हिरकणी बनवलं..आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते याचा एक जिवंत नमुना आहे हा..

एक ती हिरकणी होती.. एक आजची हिरकणी!!! आधुनिक हिरकणी म्हणजे तुम्ही, मी आणि आपल्यासारख्या असंख्य अशा माता.. आपल्या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे एक हिरकणी दडलेली आहे.. ती रोज आपल्या बाळासाठी कुठला ना कुठला गड उतरत असते.. कुठल्या ना कुठल्या संकटावर मात करत असते.. एक साधारण मुलगी(तुमच्या माझ्यातली), जी अगदी इंजेकशन टोचलं तरी दवाखाना डोक्यावर घेणारी बाळ जन्माला घालताना त्या जीवघेण्या वेदना कशी सहन करते, आणि बाळाला बघताच त्या सगळ्या वेदना एक क्षणात कशी विसरते?? तेव्हा प्रत्येकीलाच पहिल्यांदा आपल्यातल्या हिरकणीचे दर्शन होते.. मग त्या दिवसापासून त्या हिरकणीचा आयुष्य नावाचं गड उतरण्याचा प्रवास सुरु होतो आणि तो संपतो तिच्या शेवटासोबतच!!

प्रत्येक आई ही हिरकणी असते.. मग ती नोकरी करणारी असो अथवा गृहिणी असो.. नोकरी करणारी आई आपल्या काळजाच्या तुकड्याला घरी किंवा पाळणाघरात टाकून जाते कामावर.. कुणी गरज म्हणून कुणी स्वाभिमान म्हणून तर कुणी इच्छा म्हणून कामाला जाते.. समाज तिलाही नावं ठेवतोच पण खरं सांगा कुठल्या आईला आपल्या मुलांना असं एकटं सोडावं वाटतं किंवा आपल्या मुलांसोबत वेळ घालवायला आवडत नाही पण प्रत्येकाच्या काही आपल्या समस्या असतात, आपले विचार असतात.

सकाळी आपल्या घरच्यांची, पिल्लांची सोय लावून निघते ती घरट्यातून बाहेर.. अफाट गर्दीतून आपला रस्ता शोधते, बस, लोकल, टॅक्सी पर्यंत पोहचते.. धक्के खात कामावर पोहचते.. दिवसभर तिथेही राबते.. पुन्हा गर्दीचा लोंढा ओलांडत घरी पोहचते.. आपला सगळं थकवा बाजूला ठेवून पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते.. फरक एवढाच की तेव्हा त्या हिरकणीसाठी गड दगडाचा होता आजच्या हिरकणीसाठी माणसांचा आहे, लोकांच्या दीन विचारांचा आहे, घाणेरड्या नजरांचा आहे, गर्दीतल्या किळसवाण्या स्पर्शाचा आहे… याउलट एक गृहिणी घरात सगळ्यांना पुरून उरते.. सकाळी उठल्यापासून संसाराचे रहाटगाडगे हाकते, मुलांची हक्काची ट्युशन असते ती, सासू सासऱ्यांची हक्काची नर्स असते ती, नवऱ्याची हक्काची असिस्टंट असते ती.. कमवत नसली तरी पै न पै वाचवून संसाराचं, मुलांच्या भविष्याचं सोनं करते.. बरं तिलाही काही लोक नाव ठेवतात हा.. दिवसभर काय काम करते, झोपा काढते, शिक्षण असून घरात बसलीये आणि बरच काही.. तिच्यासाठी गड असतो तो असल्या टोमण्यांचा, कधीच न संपणाऱ्या अपेक्षांचा, तिला ‘taken for granted ‘ घेतल्या जाणाऱ्या मानसिकतेचा…

हिरकणी मातृत्वाचा बाणा आहे, गरज पडली तर पुरुषत्वाचाही कणा आहे.. ती त्यागाची मूर्ती आहे, पुरुषाच्या प्रत्येक यशामागची कीर्ती आहे.. ती मुलांसाठी, नवऱ्यासाठी, कुटुंबासाठी लढते, झगडते, प्रसंगी अडखळते, पडतेही पण हरत नाही पुन्हा उभी राहते पदर खोचून.. जिद्दीने सगळी संकटं पेलते, तिच्या पिल्लांना आभाळात उंच भरारी घ्यायला शिकवते..

आज सलाम माझा त्या प्रत्येक संकटाला, तिच्या त्या त्यागाला, तिच्यातल्या जिद्दीला, त्या घाणेरड्या नजराना, त्या अफाट गर्दीला, त्या किळसवाण्या स्पर्शाना, त्या मन दुखवणाऱ्या टोमण्यांना, त्या अवाजवी अपेक्षांना, त्या अभाळाएव्हढ्या आव्हानांना.. ज्यांना ती पापणीच्या केसासारखी अलगद झेलून घेते… ज्यांच्यामुळे तुमच्या माझ्यासारखी साधारण स्त्री अनन्यसाधारण “हिरकणी”बनते…

©®सुवर्णा राहुल बागुल

Liked it? Share with your friends...

You May Also Like

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *